नमस्कार शिक्षक मित्रांनो,
गणिताचा तास सुरू झाला की वर्गातल्या अर्ध्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब होतो हे तुम्हीही अनेकदा अनुभवलं असेल. मुलांना बेरीज, वजाबाकी किंवा भूमितीचे आकार नुसते फळ्यावर खडूने काढून शिकवले की ते डोक्यावरून जाते. त्यांना काहीतरी हाताळायला मिळाले, स्वतःच्या हाताने कृती करायला मिळाली तर गणित हाच विषय त्यांचा सर्वात आवडता बनू शकतो.
पण आता तुम्ही म्हणाल की यासाठी बाजारातून महागडे शैक्षणिक साहित्य म्हणजेच TLM आणायचे कुठून? शाळेला मिळणारी ग्रँट कमी आणि त्यात हे असले खर्च कसे परवडणार? तर मंडळी, आज आपण अशा काही आयडिया बघणार आहोत ज्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. आपल्या घरात आणि आजूबाजूला पडलेल्या टाकाऊ वस्तूंपासूनच आपण जबरदस्त गणित साहित्य बनवू शकतो.
चला तर मग पाहूया, झिरो बजेटमध्ये गणित सोपे कसे करायचे.
काड्यापेटीतल्या काड्या आणि रबर बँड TLM साहित्य
पहिली आणि दुसरीच्या मुलांना एकक आणि दशक ही संकल्पना समजायला सर्वात जास्त जड जाते. यासाठी बाजारात मणी माळ मिळते पण ती विकत घेण्यापेक्षा आपल्या घरातल्या वापरलेल्या काड्यापेटीतल्या काड्या जमा करा.
दहा काड्यांचा एक गट करा आणि त्याला रबर बँड लावून बांधा. हा झाला तुमचा एक दशक. सुट्ट्या काड्या म्हणजे एकक. जेव्हा तुम्ही मुलांना हे हातांत देऊन 12 ही संख्या तयार करायला सांगाल, तेव्हा मूल पटकन एक दशकाचा गट आणि दोन सुट्ट्या काड्या उचलतील. ही पद्धत फळ्यावरच्या चित्रापेक्षा शंभर पट जास्त प्रभावी आहे आणि याला खर्च शून्य आहे.
$ads={1}
लग्नाच्या जुन्या पत्रिका आणि पुठ्ठे
लग्नाचा सीझन संपला की घरात पत्रिकांचे ढीग साचतात. या पत्रिकांचे कागद खूप जाड आणि चांगल्या क्वालिटीचे असतात. हे कागद फेकून देण्यापेक्षा त्याचे विविध आकार कापा.
त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ असे आकार कापून तुम्ही भूमितीची ओळख करून देऊ शकता. तसेच या पुठ्ठ्यांवर 1 ते 100 अंक लिहून त्याचे फ्लॅश कार्ड्स तयार करता येतील. पहिलीच्या मुलांना जोड्या जुळवा किंवा अंक ओळखा या खेळांसाठी हे कार्ड्स वर्षानुवर्षे टिकतात.
बाटलीची झाकणे
मिनरल वॉटर किंवा कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यांची प्लॅस्टिकची झाकणे ही गणितासाठी एक खजिना आहे. रस्त्यावर किंवा कचऱ्यात ही झाकणे सहज सापडतात. वेगवेगळ्या रंगांची झाकणे जमा करून ठेवा.
याचा वापर करून तुम्ही मुलांना पॅटर्न पूर्ण करणे शिकवू शकता. उदाहरणासाठी एक लाल झाकण, दोन निळी झाकणे आणि परत एक लाल झाकण ठेवले तर पुढे काय येईल? हे मुलांना ओळखायला सांगा. तसेच बेरीज आणि वजाबाकीसाठी खडे वापरण्याऐवजी ही रंगीत झाकणे वापरली तर मुलांना ती मोजायला खूप मजा येते.
जुन्या कॅलेंडरचा TLM म्हणून वापर
वर्ष संपले की आपण भिंतीवरचे कॅलेंडर रद्दीत देतो. पण गणिताच्या शिक्षकांसाठी हे कॅलेंडर खूप कामाचे आहे. त्यातील अंकांचा वापर करून तुम्ही संख्या वाचन घेऊ शकता.
$ads={2}
एखाद्या महिन्याचे पान फाडून मुलांना द्या आणि सांगा की, ज्या तारखांमध्ये 2 हा अंक आहे त्या ओळखा. किंवा सम आणि विषम संख्यांना गोल करा. हे खेळ मुले गटात बसून खूप आवडीने खेळतात आणि कळत नकळत त्यांचे संख्याज्ञान पक्के होते.
आईच्या जुन्या बांगड्या वापरून TLM साहित्य
वर्तुळ हा आकार शिकवण्यासाठी बांगडीपेक्षा सोपे साधन दुसरे नाही. पण बांगड्यांचा वापर फक्त आकार काढण्यासाठी नाही तर अपूर्णांक शिकवण्यासाठी सुद्धा करता येतो.
प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बांगड्यांचे समान तुकडे करा. अर्धी बांगडी, पाव बांगडी असे भाग करून तुम्ही मुलांना अर्धा, पाव आणि पाऊण या संकल्पना प्रत्यक्ष दाखवू शकता. फळ्यावर काढलेल्या भाकरीपेक्षा हातात धरलेला बांगडीचा तुकडा मुलांच्या जास्त लक्षात राहतो.
मित्रांनो, गणित शिकवण्यासाठी भारीतल्या साधनांची गरज नसते तर कल्पकतेची गरज असते. वर दिलेल्या या पाच वस्तू गोळा करायला तुम्हाला पैसे लागणार नाहीत, पण त्याचा वापर करून जेव्हा तुम्ही वर्गात जाल तेव्हा मुलांच्या डोळ्यांतली चमक तुम्हाला नक्कीच समाधान देईल.
तुम्ही तुमच्या शाळेत यापैकी कोणता प्रयोग केला आहे किंवा तुमच्याकडे अजून काही अशाच आयडिया असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आपण एकमेकांच्या मदतीनेच मुलांना गणिताची गोडी लावू शकतो.


Post a Comment