नमस्कार,
शाळेत जाणारी मुले असोत किंवा त्यांना शिकवणारे पालक आणि शिक्षक, सर्वांना सतावणारा एक कॉमन प्रश्न म्हणजे पाढे पाठ कसे करायचे. पहिली दुसरीपर्यंत ठीक असते पण जेव्हा मुले तिसरी चौथीला जातात तेव्हा गुणाकार आणि भागाकार करण्यासाठी पाढे येणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा आपण मुलांना पट्टीने मारून किंवा ओरडून पाढे पाठ करायला लावतो. मुले भीतीने ते पाठ करतात सुद्धा, पण दोन दिवसांनी विचारले की पुन्हा पाटी कोरी होते.
याचे मुख्य कारण म्हणजे आपण त्यांना पाढे म्हणजे काय हे न समजवता फक्त पोपटासारखे रट्टा मारायला लावतो. जर मुलांना अंकांमधील गंमत समजली तर ते कधीच पाढे विसरणार नाहीत. आजच्या या लेखात आपण अशाच काही सोप्या आणि हसत खेळत पाढे शिकवण्याच्या पद्धती बघणार आहोत.
या ट्रिक्स वापरल्या तर मुलांना गणिताचा कंटाळा तर येणार नाहीच पण त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल.
रट्टा नको, बेरजेची गंमत शिकवा
मुलांना सर्वात आधी हे समजले पाहिजे की गुणाकार म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एकाच संख्येची वारंवार केलेली बेरीज आहे.
$ads={1}
जेव्हा आपण 2 गुणिले 3 म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ 2 ही संख्या तीन वेळा घेऊन बेरीज करणे असा होतो. सुरुवातीला मुलांना पाढे पाठ करायला सांगू नका. त्यांना लहान लहान वस्तू द्या. उदाहरणार्थ 2 चॉकलेट्स एका मुलाला, असे 3 मुलांना वाटले तर एकूण किती झाले? मुले मोजून सांगतील 6 झाले.
ही सवय लागली की त्यांना समजते की पाढे म्हणजे काहीतरी पाठ करणे नसून ती एक सोपी बेरीज आहे. एकदा ही संकल्पना डोक्यात फिट बसली की अर्धे काम तिथेच सोपे होते.
9 च्या पाढ्याची बोटांवरची जादू
9 चा पाढा मुलांना सर्वात अवघड वाटतो कारण त्यात मोठ्या संख्या येतात. पण गंमत म्हणजे 9 चा पाढा सर्वात सोपा आहे आणि तो पाठ करायची गरजच नाही. यासाठी फक्त हाताची दहा बोटे वापरावी लागतात.
तुमच्या हाताची दहा बोटे मुलांसमोर धरा. आता समजा तुम्हाला 9 गुणिले 3 करायचे आहे. तर डावीकडचे तिसरे बोट दुमडा. आता दुमडलेल्या बोटाच्या डाव्या बाजूला किती बोटे उरली? तर 2 उरली. आणि उजव्या बाजूला किती बोटे उरली? तर 7 उरली. झाले उत्तर तयार 2 आणि 7 म्हणजे 27.
$ads={2}
अशाच प्रकारे 9 गुणिले 5 करायचे असेल तर पाचवे बोट दुमडा. डावीकडे उरले 4 आणि उजवीकडे उरले 5. उत्तर आले 45. ही ट्रिक मुलांना एखाद्या जादूसारखी वाटते आणि ते खूप आवडीने 9 चा पाढा म्हणतात.
मोठ्या पाढ्यांसाठी फोडा आणि जोडा पद्धत
जेव्हा 12, 13, 14 असे मोठे पाढे येतात तेव्हा मुलांची गाडी अडते. अशा वेळी त्यांना फोडा आणि जोडा ही पद्धत शिकवा.
समजा 12 चा पाढा तयार करायचा आहे. मुलांना सांगा की 12 म्हणजे 10 अधिक 2. आता मुलांना 10 चा पाढा येतो आणि 2 चा पाढा पण येतो. मग 12 चा पाढा बनवणे खूप सोपे आहे.
उदाहरणार्थ 12 गुणिले 4 करायचे आहे. पहिली स्टेप: 10 गुणिले 4 करा, उत्तर आले 40. दुसरी स्टेप: 2 गुणिले 4 करा, उत्तर आले 8. तिसरी स्टेप: आता 40 आणि 8 यांची बेरीज करा. उत्तर आले 48.
सुरुवातीला हे अवघड वाटेल पण एकदा सराव झाला की मुले मनातल्या मनात हे गणित करून 18 किंवा 19 चा पाढा सुद्धा सहज सांगतात. यामुळे त्यांची तोंडी हिशोब करण्याची सवय वाढते.
गाणी आणि तालासुरात पाढे
आपले जुने गुरुजी पाढे म्हणताना एका विशिष्ट लयीत म्हणायचे. बे एक बे, बे दुणे चार... हा जो सूर असतो तो मेंदूला गोष्टी लक्षात ठेवायला मदत करतो.
नुसते अंक वाचण्यापेक्षा त्याला गाण्याची जोड द्या. वर्गात किंवा घरी सुद्धा टीव्हीवर गाणी लावण्यापेक्षा मोबाईलवर पाढ्यांची गाणी लावा. मुले खेळता खेळता ते गुणगुणतील आणि त्यांच्या नकळत पाढे पाठ होतील. संगीतामुळे कंटाळवाणा अभ्यास सुद्धा मनोरंजक होतो.
$ads={2}
मित्रांनो, प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वेगळी असते. काहींना दोन दिवसात पाढे पाठ होतात तर काहींना महिना लागतो. म्हणून तुलना करू नका. त्यांना वेळ द्या. रोज फक्त 10 मिनिटे पाढ्यांचा सराव घेतला तरी पुरेसे आहे.
घरी आईने स्वयंपाक करताना किंवा बाबांनी बाजारात जाताना छोट्या छोट्या हिशोबात मुलांना सामावून घेतले तर गणिताची भीती नक्कीच पळून जाईल.
तुम्ही तुमच्या मुलांना पाढे शिकवण्यासाठी कोणती पद्धत वापरता? आम्हाला नक्की कळवा.

Post a Comment