नमस्कार मित्रानो,
इंग्रजी शिकताना सर्वात जास्त डोकेदुखी कशाची असेल तर ती म्हणजे Tenses म्हणजेच काळ. शाळेत आपल्याला शिकवले जाते की एकूण १२ काळ आहेत आणि प्रत्येकाचे वेगळे सूत्र आहे. करता अधिक कर्म अधिक क्रियापद असे पाठ करून आपण गोंधळून जातो.
पण तुम्हाला माहित आहे का? काळ ओळखण्यासाठी इंग्रजीचे नियम पाठ करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त मराठी वाक्याचा शेवटचा शब्द बघून ओळखू शकता की इंग्रजीत कोणते वाक्य बनवायचे आहे. आज आपण सर्वात महत्त्वाचे ३ काळ अगदी सोप्या पद्धतीत शिकणार आहोत.
साधा वर्तमानकाळ (Simple Present Tense)
जेव्हा आपण आपल्या रोजच्या सवयींबद्दल बोलतो तेव्हा हा काळ वापरला जातो.
ओळखण्याची खूण: जर मराठी वाक्याच्या शेवटी तो, ती, ते किंवा तात हे शब्द आले असतील, तर समजायचे की हा Simple Present Tense आहे.
इंग्रजी नियम: इथे क्रियापदाचे पहिले रूप (V1) वापरले जाते.
उदाहरणे: मराठी: मी क्रिकेट खेळतो. - I play cricket.
मराठी: ती शाळेत जाते. - She goes to school.
मराठी: ते अभ्यास करतात. - They study.
बघा किती सोपे आहे! वाक्याच्या शेवटी 'तो' आला की डोळे झाकून क्रियापदाचे पहिले रूप वापरा.
सरावासाठी साधा वर्तमानकाळ (Simple Present Tense) ची काही वाक्ये
१. मी सकाळी लवकर उठतो - I wake up early in the morning
२. तो रोज व्यायाम करतो - He exercises daily
३. ती छान स्वयंपाक करते - She cooks well
४. आम्ही शाळेत जातो - We go to school
५. पक्षी आकाशात उडतात - Birds fly in the sky
६. मला आंबा आवडतो - I like mango
७. सूर्य पूर्वेला उगवतो - The sun rises in the east
८. ती इंग्रजी बोलते - She speaks English
९. मुले मैदानात खेळतात - Children play on the ground
१०. माझे बाबा ऑफिसला जातात - My father goes to office
११. आई मला ओरडते - Mother scolds me
१२. तो खोटे बोलतो - He tells a lie
१३. ती गाणे गाते - She sings a song
१४. आम्ही टीव्ही बघतो - We watch TV
१५. गाय दूध देते - The cow gives milk
१६. मी अभ्यास करतो - I study
१७. ते पुण्यात राहतात - They live in Pune
१८. मला कॉफी आवडते - I like coffee
१९. तो वेगाने धावतो - He runs fast
२०. ती देवाची पूजा करते - She worships God
साधा भूतकाळ (Simple Past Tense)
जी गोष्ट घडून गेली आहे किंवा जी क्रिया पूर्ण झाली आहे, त्यासाठी हा काळ वापरतात.
ओळखण्याची खूण: जर मराठी वाक्याच्या शेवटी ला, ली, ले किंवा लो हे शब्द आले असतील, तर तो Simple Past Tense असतो.
इंग्रजी नियम: इथे नेहमी क्रियापदाचे दुसरे रूप (V2) वापरले जाते.
उदाहरणे: मराठी: मी क्रिकेट खेळलो. (क्रिया पूर्ण झाली) - I played cricket.
मराठी: ती शाळेत गेली. - She went to school.
मराठी: त्यांनी अभ्यास केला. - They studied.
लक्षात ठेवा, जिथे 'ला-ली-ले' तिथे क्रियापदाचे दुसरे रूप.
सरावासाठी साधा भूतकाळ (Simple Past Tense) ची काही वाक्ये
१. मी सकाळी लवकर उठलो - I woke up early in the morning
२. त्याने व्यायाम केला - He exercised
३. तिने स्वयंपाक केला - She cooked
४. आम्ही शाळेत गेलो - We went to school
५. पक्षी आकाशात उडाले - Birds flew in the sky
६. मी आंबा खाल्ला - I ate a mango
७. सूर्य उगवला - The sun rose
८. ती इंग्रजी बोलली - She spoke English
९. मुले खेळली - Children played
१०. बाबा ऑफिसला गेले - Father went to office
११. आई मला ओरडली - Mother scolded me
१२. तो खोटे बोलला - He told a lie
१३. तिने गाणे गायले - She sang a song
१४. आम्ही टीव्ही बघितला - We watched TV
१५. गाईने दूध दिले - The cow gave milk
१६. मी अभ्यास केला - I studied
१७. ते पुण्यात राहिले - They lived in Pune
१८. मला कॉफी आवडली - I liked the coffee
१९. तो वेगाने धावला - He ran fast
२०. तिने पूजा केली - She worshipped God
साधा भविष्यकाळ (Simple Future Tense)
जी गोष्ट अजून घडायची आहे किंवा आपण भविष्यात करणार आहोत, त्यासाठी हा काळ वापरतात.
ओळखण्याची खूण: जर मराठी वाक्याच्या शेवटी नार किंवा एन हे शब्द आले असतील, तर तो Simple Future Tense असतो.
इंग्रजी नियम: इथे Will आणि क्रियापदाचे पहिले रूप (V1) वापरले जाते.
उदाहरणे: मराठी: मी क्रिकेट खेळणार. - I will play cricket.
मराठी : ती शाळेत जाणार. - She will go to school.
मराठी: आम्ही अभ्यास करू. - We will study.
मित्रांनो, आता १२ काळ पाठ करत बसू नका. फक्त हे कोष्टक लक्षात ठेवा
१. वाक्य संपते तो/ती/ते वर = Play (V1) २. वाक्य संपते ला/ली/ले वर = Played (V2) ३. वाक्य संपते णार वर = Will Play (Will + V1)
सरावासाठी साधा भविष्यकाळ (Simple Future Tense) ची काही वाक्ये
१. मी लवकर उठेन - I will wake up early
२. तो व्यायाम करेल - He will exercise
३. ती स्वयंपाक करेल - She will cook
४. आम्ही शाळेत जाऊ - We will go to school
५. पक्षी उडतील - Birds will fly
६. मी आंबा खाईन - I will eat a mango
७. सूर्य उगवेल - The sun will rise
८. ती इंग्रजी बोलेल - She will speak English
९. मुले खेळतील - Children will play
१०. बाबा ऑफिसला जातील - Father will go to office
११. आई मला ओरडेल - Mother will scold me
१२. तो खोटे बोलेल - He will tell a lie
१३. ती गाणे गाईल - She will sing a song
१४. आम्ही टीव्ही बघू - We will watch TV
१५. गाय दूध देईल - The cow will give milk
१६. मी अभ्यास करेन - I will study
१७. ते पुण्यात राहतील - They will live in Pune
१८. मला कॉफी आवडेल - I will like coffee
१९. तो वेगाने धावेल - He will run fast
२०. ती पूजा करेल - She will worship God
जेव्हा तुम्ही या पद्धतीने सराव कराल, तेव्हा तुम्हाला इंग्रजी बोलताना विचार करावा लागणार नाही. सुरुवातीला या तीन काळांवर प्रभुत्व मिळवा, कारण बोलताना ७० टक्के वेळा आपण हेच तीन काळ वापरतो.
इंग्रजी ही खूप सोपी भाषा आहे, फक्त तिला मराठीशी जोडून शिकले पाहिजे. आजपासून जेव्हा तुम्ही कोणतेही मराठी वाक्य बोलाल, तेव्हा त्याच्या शेवटी कोणता शब्द आला आहे याकडे लक्ष द्या आणि त्यानुसार इंग्रजी वाक्य बनवा.
तुम्हाला ही 'ता-ती-ते' आणि 'ला-ली-ले' पद्धत कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा.

Post a Comment