नमस्कार मित्रांनो,
आपल्या भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे 'शून्य' आणि 'वैदिक गणित'. हे आपल्या पूर्वजांनी शोधलेले असे ज्ञान आहे, ज्याचा वापर करून आपण गणिताची अवघड कोडी सेकंदात सोडवू शकतो. अनेकदा स्पर्धा परीक्षेत किंवा शिष्यवृत्ती परीक्षेत गुणाकार करायला मुलांचा खूप वेळ जातो. पण जर तुम्हाला वैदिक गणित येत असेल, तर तुम्ही हेच काम काही क्षणात करू शकता.
आज आपण अशा ३ सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत, ज्या बघून तुम्हाला गणिताची जादू वाटेल.
कोणत्याही संख्येला ११ ने गुणण्याची ट्रिक
जर तुम्हाला कोणी सांगितले की २३ ला ११ ने गुणा, तर तुम्ही नेहमीच्या पद्धतीने गुणाकार करत बसाल. पण वैदिक गणितात यासाठी पेन उचलायची सुद्धा गरज नाही.
याची पद्धत खूप सोपी आहे: ज्या संख्येला गुणायचे आहे, त्याचे दोन अंक थोडे लांब लांब लिहा. समजा २३ ला गुणायचे आहे, तर २ आणि ३ थोडे लांब लिहा. आता या दोन्ही अंकांची बेरीज करा (२ + ३ = ५). हा ५ त्या दोन अंकांच्या मध्ये ठेवा. झाले तुमचे उत्तर तयार २५३!
आणखी एक उदाहरण बघू: ५४ गुणिले ११. ५ आणि ४ लांब लिहा. त्यांची बेरीज (९) मध्ये लिहा. उत्तर आले ५९४. आहे की नाही जादू?
ज्याच्या शेवटी ५ आहे त्याचा वर्ग करणे
१५, २५, ३५ अशा संख्यांचा वर्ग करायला मुलांना खूप वेळ लागतो. पण या ट्रिकने हे काम फक्त २ सेकंदात होते.
समजा ३५ चा वर्ग करायचा आहे. सर्वात आधी ५ चा वर्ग २५ डोळे झाकून शेवटी लिहून टाका. आता ५ च्या आधी जो अंक आहे, म्हणजे ३, त्याच्या पुढचा अंक मनात आणा (३ च्या पुढे येतात ४). आता ३ आणि ४ चा गुणाकार करा (३ x ४ = १२). हे १२ त्या २५ च्या आधी लिहा. उत्तर आले १२२५.
ही ट्रिक तुम्ही ६५, ७५ आणि अगदी ९५ साठी सुद्धा वापरू शकता.
१०० च्या जवळच्या संख्यांचा गुणाकार
जर तुम्हाला ९८ गुणिले ९७ करायचे असेल, तर नेहमीच्या पद्धतीने २ मिनिटे लागतील. पण या ट्रिकने हे तोंडी करता येईल.
बघा, ९८ हे १०० पेक्षा कितीने कमी आहेत? तर २ ने. आणि ९७ हे १०० पेक्षा कितीने कमी आहेत? तर ३ ने. आता या २ आणि ३ चा गुणाकार करा, तो येतो ६ (तो ०६ असा लिहा). आता ९८ मधून ३ वजा करा किंवा ९७ मधून २ वजा करा. दोन्हीचे उत्तर ९५ येते. हे ९५ त्या ०६ च्या आधी लिहा. उत्तर आले ९५०६.
मित्रांनो, वैदिक गणित हे फक्त पाठांतर नाही, तर ती बुद्धीला चालना देणारी पद्धत आहे. या ट्रिक्स तुम्ही मुलांना शिकवल्या, तर त्यांचा गणिताचा तास कधीच कंटाळवाणा होणार नाही आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
तुम्हाला यातील कोणती ट्रिक सर्वात जास्त आवडली? हे खाली कमेंट करून नक्की सांगा.
.webp)
.webp)
Post a Comment